उभयान्वयी अव्यय - संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स
उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय अविकारी आहेत कारण त्यांच्यात कधीच कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही.
ही शब्दजाती केवळ जोडण्याचे काम करते, उभयान्वयी अव्ययांचा कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या कार्याशी कोणताही संबंध नसतो.
उदाहरणे:
- पाऊस चांगला पडला; परंतु पीक चांगले आले नाही.
- गुरुजी म्हणाले की, पृथ्वी गोल आहे.
- तो नापास झाला, हे खरे नाही.
उभयान्वयी अव्ययाच्या अतिरिक्त व्याख्या
- दादोबा पांडुरंग तर्खडकर : ज्या अव्ययांचा संबंध दोन शब्दांच्या अथवा दोन वाक्यांच्या परस्पर अन्वयाकडेच असतो त्यास उभयान्वयी अव्यय म्हणावे.
- कृष्णशास्त्री चिपळूणकर : वाक्यार्थात जुळण्यासारखा स्वतंत्र अर्थ त्यास नसतो, परंतु ज्याच्या योगाने वाक्यापासून अधिक अर्थ भासतो, त्या अव्ययास उभयान्वयी अव्यये म्हणावे.
- कृ. पां. कुलकर्णी : उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोड किंवा संबंध. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणारा शब्द ते उभयान्वयी अव्यय होय.
- मो. के. दामले : जे अव्यय क्रियेचे विशिष्टत्व न दाखविता एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध दाखविते म्हणजे एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालते त्यास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभयान्वयी अव्ययांचे प्रकार
उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख दोन प्रकार पडतात व प्रत्येकी 4 असे एकूण 8 प्रकार मानले जातात.
| प्रधानत्वसूचक (संयुक्त वाक्य) | गौणत्वसूचक (मिश्र वाक्य) |
|---|---|
| 1) समुच्चयबोधक | 1) उद्देशबोधक |
| 2) विकल्पबोधक | 2) संकेतबोधक |
| 3) न्यूनत्वबोधक | 3) स्वरूपबोधक |
| 4) परिणामबोधक | 4) कारणबोधक |
1. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये (प्रधानवाक्य) म्हणजेच एकमेकांवर अवलंबून नसणाऱ्या वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये होतात. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांना 'समानाधिकरण अव्यये' असे देखील म्हणतात.
प्रधान वाक्य + प्रधान वाक्य = संयुक्त वाक्य
1) समुच्चयबोधक
या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. जेव्हा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडावयाची असतात तेव्हा शेवटच्या वाक्यापूर्वी/शब्दापूर्वी आणि/व चा वापर केला जातो.
उदा. व, अन्, आणि, आणखी, न, नि, शिवाय, आणिक, मग, नंतर इ.
- वारा सुटला. आणि पावसाला सुरुवात झाली.
- मोगरा फुलला व कळ्यांना बहर आला.
- तानाजींनी टाच मारली. अन् ते घोड्यावर स्वार झाले.
- मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली.
- मधुला गोरी नि शिकलेली बायको पाहिजे.
- प्रेमिकांच्या ठायी प्रेम आणि श्रद्धा हवी.
- लता व मनोज विजूच्या घरी गेले. (केवळ वाक्य)
- सचिनने अभ्यास केला व तो पास झाला. (संयुक्त वाक्य)
- सोनू सुंदर व हुशार आहे. (संयुक्त वाक्य)
- मला गुलमोहर व आंब्याची झाडे दिसली. (संयुक्त वाक्य)
2) विकल्पबोधक
या उभयान्वयी अव्ययातून पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकाला पसंती दर्शविली जाते.
उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर, नाहीतर इ.
- पुस्तक मिळविण्यासाठी समक्ष भेटा अगर फोन करा.
- देह जावो अथवा राहो.
- विज्ञान शाप की वरदान.
- नरोबा वा कुंजरोबा
- कुणी निंदा वा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा.
- मी जेवण करील नाहीतर उपाशी राहिल, तुम्हाला काय त्याचे?
- त्याने नीताला किंवा लताला आपल्याबरोबर न्यावे.
- माणसाने पाप वा पुण्याचा विचार करावा.
- प्रेम की कर्तव्य असा संघर्ष प्रत्येकाच्याच मनात असतो.
3) न्यूनत्वबोधक
'न्यूनत्व' या शब्दाचा अर्थ 'उणीव/कमीपणा' असा असल्यामुळे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते.
उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इ.
- सचिनने शतक झळकावले; पण भारताने सामना गमावला.
- तिने स्वयंपाक करून ठेवला; पण पाहुणे आलेच नाहीत.
- मरावे; परी कीर्तिरूपी उरावे
- बाबांना थोडा ताप होता, बाकी सर्व ठीक.
- वैद्याने औषध दिले; परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
- त्याने शेतीत खूप कष्ट घेतले, तरीपण एक-दोन कामे राहिलीच.
4) परिणामबोधक
पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो.
उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, की, अतएव, त्यामुळे इ.
- तो आजारी होता; म्हणून शाळेत आला नाही.
- तिने मनापासून अभ्यास केला नाही; सबब तिला पहिला वर्ग मिळाला नाही.
- माशास फुफ्फुसे नाहीत, म्हणून त्यांना शब्द नाहीत.
- विरोज पहिला आला, म्हणून त्याचे नाव शाळेच्या फळ्यावर झळकले.
- माझे एक गणित चुकले, त्यामुळे मला दोन गुण कमी मिळाले.
- उद्या भूगोलाचा पेपर आहे, याकरिता कंपास पेटी आणणे आवश्यक आहे.
- तुम्ही खूप कष्ट केलेत, तेव्हा थोडा आराम करा.
- यंदा कर्तव्य नाही, तस्मात वधू परीक्षा नाही.
- पोलीस आयुक्त सर्व जाणतात, अतएव एवढी दक्षता घेतात.
- तो तिच्यावर उत्कट प्रेम करतो, म्हणून ती स्वत:ला भाग्यवान समजते.
- ते फार खोडकर आहे, म्हणून आई त्याच्याबरोबर रागावते.
- पैसा आला की, माणुसकी संपलीच म्हणून समजा.
2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्ये असतात. यातील स्वतंत्र अर्थ असणारे वाक्य प्रधान वाक्य तर अशा वाक्यावर अर्थपूर्णतेसाठी अवलंबून असणारे एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांना व्याधिकरण अव्यये असे देखील म्हणतात.
प्रधान वाक्य + गौण वाक्य = मिश्र वाक्य
1) स्वरूपबोधक
या उभयान्वयी अव्ययाने प्रधान वाक्यातील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे गौण वाक्यात दिलेले असते.
उदा. म्हणून, म्हणजे, की, जे, इ.
- संभाजी राजे म्हणजे शिवाजी राजेस एक पुत्र होते.
- एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर.
- गुरुजी म्हणाले की, पृथ्वी गोल आहे.
- अश्व म्हणजे घोडा.
- कोबी म्हणून एक भाजी आहे.
- त्याने मला वचन दिले आहे की, वाटेल त्या दिवशी मी तुला गणित शिकविल.
- मित्राय नमः! इथे मित्र म्हणजे सूर्य होय.
- राजा म्हणाला की राज्यात हत्तीवरून साखर वाटा.
- ती म्हणाली की मी तुमचीच आहे.
उदा. साष्टांग नमस्कार विनंती ऐशीजे.
2) उद्देशबोधक
प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू किंवा उद्देश गौण वाक्यातून दर्शविला जातो. उद्देश दर्शक वाक्यातील क्रियापदाला शक्यतो वा, वी, वे प्रत्यय असतो.
उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण की, एतदर्थ, यासाठी, याकरिता इ.
- चांगले गुण मिळावेत म्हणून ती खूप अभ्यास करते.
- त्याला मुंबईला जायचे आहे सबब तो शाळेला येणार नाही.
- चांगले उपचार मिळावेत यास्तव तो तालुक्याला जात आहे.
- शेवटचा दिवस गोड व्हावा याचसाठी केला होता अट्टहास.
- त्याला मरायचे होते म्हणून तो विष प्याला.
- माशांना फुफ्फुसे नाहीत; म्हणून ते बोलू शकत नाहीत. (परिणाम)
- चांगले उपचार मिळावेत म्हणून मी तालुक्याला जात आहे. (उद्देश)
3) संकेतबोधक
गौण वाक्यात अट (संकेत) दर्शविली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो.
उदा. जर-तर, म्हणजे, की, तर, जरी-तरी
- जर अभ्यास केला, तर पास व्हाल.
- पास झालो, की पेढे वाटीन.
- तू इशारा केलास, की मी येईन.
- पालथ्या घड्यावर जरी नळाची धार सोडली तरी तो भरणार नाही.
- वाटेत भूक लागली तरी बाहेरचे खाऊ नये.
- जरी कैकयीने हट्ट धरला नसता तरी राम वनात गेलाच असता.
- जरी घरातील लोक जागे असते तरी चोरी झालीच असती.
- प्रेम केलेत की कविता आपोआपच सुचते.
- लोकांची कामे करा म्हणजे ते तुम्हास निवडून देतील.
- जरी त्याने प्रेम केले, तरी तिने लग्नाला नकार दिला.
4) कारणबोधक
प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शविणारे गौणवाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. कारण, का-की
- त्याला शिक्षा झाली; कारण त्याने चोरी केली.
- भारत सामना जिंकला; कारण खेळाडूंनी चांगल्या धावा केल्या.
- तो एकाकी मेला; कारण की औषधाऐवजी तो विषच प्याला.
- ती त्याच्यावर जीव टाकत होती; कारण की ती त्याच्या हुशारीने प्रभावित झाली होती.
ती त्याच्या हुशारीने प्रभावित झाली होती, म्हणून ती त्याच्यावर जीव टाकत होती.
'की' या उभयान्वयी अव्ययाविषयी महत्त्वाचे
अ) स्वरूप/संकेत दर्शविल्यास - मिश्र वाक्य
- बाबा म्हणाले की, मी तुला नवे कपडे घेईल.
- पास झालो की पेढे वाटीन.
ब) विकल्प/परिणाम दर्शविल्यास - संयुक्त वाक्य
- तू जेवण करणार की चहा घेणार? (विकल्प)
- तो इतका रडला, की त्याचे डोळे लाल झाले. (परिणाम)
इतर महत्त्वाचे मुद्दे
महत्त्वाचे : मूळ उभयान्वयी अव्यये सोडून सर्वनामे, क्रियाविशेषणे यांचासुद्धा उभयान्वयी अव्यये म्हणून वापर होतो.
1) सर्वनामे
जो-तो, जी-ती, जे-ते, ज्याने-त्याने, ज्याला-त्याला, ज्याचे-त्याचे - अशा जोडीच्या सर्वनामांनी जोडलेली वाक्ये मिश्र वाक्यच असतात यातील पहिले गौण तर दुसरे मुख्य वाक्य असते.
- जो आवडतो, सर्वांना (तोची) आवडे देवाला.
- जे चकाकते, ते सर्वच सोने नसते.
- जो ईश्वरास स्मरून वागतो, त्यास भिण्याचे कारण नाही.
2) क्रियाविशेषण अव्यये
जेथे-तेथे, तेव्हा-तेव्हा, जसे-तसे, जिकडे-तिकडे, ज्यावेळी-त्यावेळी - अशा क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेली वाक्ये मिश्र वाक्यच असतात. यातील पहिले गौण तर दुसरे मुख्य वाक्य असते.
- जसे करावे, तसे भरावे.
- जेथे पाणी खोल होते, तेथे जहाज बुडाले.
- जेव्हा पाऊस आला, तेव्हा मोर नाचू लागला.
3) मूळ उभयान्वयी अव्यये
म्हणून, म्हणजेच, की, जे, सबब, यास्तव, कारण-की, जर-तर, जरी-तरी, तर, परी, व, अन्, आणि, आणखी, न, नि, शिवाय, आणिक, अथवा, वा, किंवा अगर, परंतु, पण, बाकी, किंतु, याकरिता, यास्तव, तेव्हा, अतएव - ही उभयान्वयी अव्यये प्रधानत्व तसेच गौणत्व बोधक असल्याने त्यांच्यापासून केवल/संयुक्त/मिश्र वाक्य होऊ शकतात.
- मधू आला आणि चटकन गेला. (मूळ उभयान्वयी अव्यय) - संयुक्त वाक्य
- मधू व सदू घरी गेले. (मूळ उभयान्वयी अव्यय) - केवल वाक्य

Post a Comment