Top News

वाक्यरूपांतर संपूर्ण माहिती: 9 प्रकार, नियम व उदाहरणे | MPSC Marathi Grammar 2026

MPSC, Talathi, ZP Bharti, Police Bharti सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा 25 मार्कांचा महत्वाचा विषय आहे. त्यातील 'वाक्यरूपांतर' हा घटक दरवर्षी किमान 2 ते 5 मार्कांसाठी विचारला जातो. बरेच विद्यार्थी फक्त नियम वाचून सोडून देतात, पण प्रश्न सरावाशिवाय सुटत नाहीत.

VisionGovAcademy च्या या लेखात आपण वाक्यरूपांतराचे सर्व 9 प्रकार सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि Tricks सह पाहणार आहोत. प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी, केवल-संयुक्त-मिश्र वाक्य - सगळे एकाच ठिकाणी. हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि PDF Download करून Save करा. तुमचे 5 मार्क पक्के!

वाक्यरूपांतर - MPSC Marathi Grammar | VisionGovAcademy

वाक्यरूपांतर: वाक्याच्या अर्थात बदल न करता रचनेत केलेल्या बदलास 'वाक्यरूपांतर' असे म्हणतात. वाक्यरूपांतरामुळे आपले विचार आकर्षक पद्धतीने मांडता येतात.

1) प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

नियम: प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी नकारार्थी करावे. प्रश्न नकारार्थी असल्यास विधानार्थी होकारार्थी करावे. फक्त उत्तर दडलेल्या प्रश्नाचेच रूपांतर होते.

क्र. प्रश्नार्थी विधानार्थी
जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगात सर्व सुखी असा कोणी नाही.
अन्यायाला प्रतिकार कोण करणार नाही? अन्यायाला सर्वजण प्रतिकार करतील.
आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही.
चालून आलेली संधी कोण दवडेल? चालून आलेली संधी कोणीही दवडणार नाही.
अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.
आपण त्याला भेटायला नको का? आपण त्याला अवश्य भेटायला हवे.
हातच्या काकणाला आरसा कशाला? हातच्या काकणाला आरसा लागत नाही.
फुकट दिले तर कोण नको म्हणेल? फुकट दिल्यास कोणी नको म्हणणार नाही.
हापूस आंबा कोणाला आवडत नाही? हापूस आंबा सर्वांनाच आवडतो.
१० मध्यरात्री स्मशानभूमीत एकटा कोण जाईल? मध्यरात्री स्मशानभूमीत एकटा कोणीही जाणार नाही.
११ मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी.
१२ देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी काय केले नाही? देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी सारे काही केले.
१३ आजारी माणसाला जपायला नको का? आजारी माणसाला जपायला हवे.
१४ सापाला दूध कोण पाजेल? सापाला कोणी दूध पाजणार नाही.

2) उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

नियम: मनातील तीव्र इच्छा, भावना, वैपुल्य, अतिशयत्व व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. विधानार्थी करताना वैपुल्य स्पष्ट करावे.

क्र. उद्गारार्थी विधानार्थी
काय अक्षर आहे त्याचे ! त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे.
किती लहरी असतो निसर्ग ! निसर्ग खूप लहरी असतो.
केवढी उंच इमारत ही ! ही इमारत फार उंच आहे.
किती गोड मुलगा आहे हा ! हा मुलगा फारच गोड आहे.
काय उकडले हो काल रात्री ! काल रात्री मनस्वी उकडले.
कसलं प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या मनात ! त्याच्या मनात प्रचंड वादळ उठलं होतं.
आज गाडीत कोण गर्दी ! आज गाडीत अतोनात गर्दी होती.
काय गंमत आली हो काल ! काल फार गंमत आली.
काय कोसळतोय पाऊस आज ! आज जोरदार पाऊस कोसळतोय.
१० केवढा निमुळता सुळका आहे हा ! हा सुळका फार निमुळता आहे.
११ किती सुंदर चित्र हे ! हे चित्र अत्यंत सुंदर आहे.
१२ काय वेगात धावला अर्णव शर्यतीत ! अर्णव शर्यतीत फार वेगात धावला.
१३ केवढी गर्दी झाली भाषणाला ! भाषणाला खूप गर्दी झाली.
१४ मला लॉटरीत लाख रुपये मिळाले तर ! मला लॉटरीत लाख रुपये मिळावेत अशी तीव्र इच्छा आहे.
१५ मी राज्याचा मुख्यमंत्री असतो तर ! मला राज्याचा मुख्यमंत्री होण्याची फार फार इच्छा आहे.

3) होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

नियम: विरुद्धार्थी रूप 2 प्रकारे: 1) उपसर्ग लावून - अ, अन, न, ना, नि, बे, गैर 2) विरुद्ध शब्द वापरून.

उपसर्ग जोडून:
कळत - नकळत
आदर - अनादर
रोगी - निरोगी
न्याय - अन्याय
विरुद्ध शब्द:
श्रीमंत - गरीब
मोठा - लहान
सुरुवात - शेवट
जलद - सावकाश
क्र. होकारार्थी नकारार्थी
ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही.
तो सुद्धा बराच खवचट आहे. तो सुद्धा काही कमी खवचट नाही.
वाचन हा सर्वांत उत्तम मित्र आहे. वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही.
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही.
हे आम्हाला सोयीचे आहे. हे आम्हाला गैरसोयीचे नाही.
तो कंजुष आहे. तो उदार नाही.
हे काम सोपे आहे. हे काम अवघड नाही.
त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.

3) होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर (पुढे चालू)

क्र. होकारार्थी नकारार्थी
त्याला येथे थांबवा. त्याला पुढे जाऊ देऊ नका.
१० मला साऱ्या बहिणींच आहेत. मला एकही भाऊ नाही.
११ तो सावकाश चालतो. तो जलद चालत नाही.
१२ उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत. उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही.
१३ माझ्याजवळ पैसे आहेत. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही.
१४ हे पुस्तक चांगले आहे. हे पुस्तक वाईट नाही.
१५ तो चांगलाच विसराळू आहे. तो काही कमी विसराळू नाही.
१६ या लोकांचे दारिद्र्य बघताना डोळे मिटावेसे वाटतात. या लोकांचे दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी बघवत नाही.

4) अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरणे

नियम: अनेक शब्दांऐवजी एक शब्द वाक्यात वापरल्यामुळे वाक्य अधिक सुलभ व सुटसुटीत होते.

क्र. अनेक शब्दांचा उपयोग एका शब्दाचा उपयोग
निराधार मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था त्यांनी काढली. त्यांनी एक अनाथाश्रम काढले.
केलेले उपकार जाणत नाही असा तो माणूस आहे. तो कृतघ्न माणूस आहे.
पंधरा दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते. आमची पाक्षिक बैठक असते.
ज्याचे वर्णन करता येत नाही असा तो ताजमहाल आहे. तो अवर्णनीय ताजमहाल आहे.
त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता. तो अद्वितीय योद्धा होता.
आमचे बाबा जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारे आहेत. आमचे बाबा सनातनी आहेत.
जिचा नवरा वारला अशी ती स्त्री आहे. ती विधवा आहे.
ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा तो व्यक्ती आहे. तो बहुश्रुत व्यक्ती आहे.
तो देशासाठी प्राणार्पण करणारा मनुष्य आहे. तो हुतात्मा आहे.
१० त्या बाईला आता कोणतीही इच्छा राहिली नाही. ती बाई निरिच्छ आहे.
११ एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे अशी ती भावंडे आहेत. ती सहोदर भावंडे आहेत.

5) आज्ञार्थी व विध्यर्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

क्र. आज्ञार्थी विध्यर्थी
नागरिकांनो, देशासाठी बलिदान करा ! नागरिकांनी देशासाठी बलिदान करावे.
मुलांनो, अभ्यास करा. मुलांनी अभ्यास करावा.
तुला पुरस्कार मिळो. तुला पुरस्कार मिळावा.
परमेश्वरा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे ! परमेश्वराने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.
तुम्ही सर्वजण उद्या येथेच जमावे. तुम्ही सर्वांनी उद्या येथेच जमावे.
तुम्ही सर्वांनी माझ्या घरी या. तुम्ही सर्वांनी माझ्या घरी यावे.
आमचे एवढे काम कराच. आमचे एवढे काम करावे.
मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.

6) प्रयोगांचे रूपांतर

नियम: मूळ अर्थ कायम ठेवण्यासाठी कोणत्याही प्रयोगाचे कर्मकर्तरी प्रयोगात रूपांतर करावे लागते.

  1. मांजर उंदीर पकडते. (कर्तरी)
    उंदीर मांजराकडून पकडला जातो. (कर्मकर्तरी)
  2. मी कॉफी घेतली. (कर्मणी)
    माझ्याकडून कॉफी घेतली गेली. (कर्मकर्तरी)
  3. कृष्णाने कंसाला मारले. (भावे)
    कृष्णाकडून कंस मारला गेला. (कर्मकर्तरी)
  4. मधू पुस्तक वाचतो. (कर्तरी)
    मधूकडून पुस्तक वाचले जाते. (कर्मकर्तरी)
  5. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी. (कर्मणी)
    विद्यार्थ्यांकडून शिस्त पाळली जावी. (कर्मकर्तरी)
  6. रामाने रावणास मारले. (भावे)
    रामाकडून रावण मारला गेला. (कर्मकर्तरी)

7) मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रूपांतर

  1. जेव्हा पावसाला सुरूवात होते - गौण वाक्य
    तेव्हा मोर नाचू लागतात. - प्रधान वाक्य
    जेव्हा मोर नाचू लागतात तेव्हा - गौण वाक्य
    पावसाला सुरूवात झालेली असते. - प्रधान वाक्य
  2. घड्याळात नऊ वाजतात - गौण वाक्य
    तोच नळाचे पाणी गेले. - प्रधान वाक्य
    जेव्हा नळाचे पाणी गेले - गौण वाक्य
    तेव्हा घड्याळात बरोबर नऊ वाजले होते. - प्रधान वाक्य
  3. जे जे चकाकते - गौण वाक्य
    ते ते सोने नसते. - प्रधान वाक्य
    जे जे सोने नसते ते - गौण वाक्य
    देखील केव्हा केव्हा चकाकते. - प्रधान वाक्य
  4. जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा - गौण वाक्य
    मी वर्गात जाऊन पोहचलो होतो. - प्रधान वाक्य
    जेव्हा मी वर्गात जाऊन पोहचलो - गौण वाक्य
    तेव्हा शाळेची घंटा अजून व्हायची होती. - प्रधान वाक्य
  5. जो आवडतो सर्वांना - गौण वाक्य
    तोच आवडे देवाला. - प्रधान वाक्य
    जो देवाला आवडतो - गौण वाक्य
    तोच सर्वांना आवडतो. - प्रधान वाक्य

8) शब्दांची जात बदलून वाक्यरचना करणे

नियम: शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदलता येते.

  1. श्रीमंत माणसांना गर्व फार. (विशेषण)
    श्रीमंतांना गर्व फार. (नाम)
  2. तो आता शिक्षकी पेशात स्थिर झाला. (क्रियाविशेषण अव्यय)
    तो आता शिक्षकी पेशातच स्थिरावला. (क्रियापद)
  3. त्याच्या डोळ्यात पाणी आले. (नाम)
    त्याचे डोळे पाणावले. (क्रियापद)
  4. जगात गरीब माणसांना मान मिळत नाही. (विशेषण)
    जगात गरिबांना मान मिळत नाही. (नाम)
  5. मी कागद फाडून फेकून दिला. (क्रियाविशेषण अव्यय)
    मी कागद फाडला आणि फेकून दिला. (क्रियापद)
  6. हा मुलगा हुशार आहे. (विशेषण)
    हा हुशार मुलगा आहे. (सर्वनाम)
  7. आंधळ्या माणसाला अन्नदान करा. (विशेषण)
    आंधळ्यांना अन्नदान करा. (नाम)

9) केवल - संयुक्त - मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर

Trick: 'मुळे' = केवल वाक्य, 'कारण' = मिश्र वाक्य, 'म्हणून' = संयुक्त वाक्य

1) सुटी वाक्ये :

१) मला ताप आला आहे.
२) मी शाळेत जाणार नाही.

केवल वाक्य - मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही.
मिश्र वाक्य - मी शाळेत जाणार नाही; कारण मला ताप आला आहे.
संयुक्त वाक्य - मला ताप आला आहे; म्हणून मी शाळेत जाणार नाही.

2) सुटी वाक्ये :

१) त्याने कष्ट केले.
२) त्याला फळ मिळाले.

केवल वाक्य - त्याने कष्ट केल्यामुळे त्याला फळ मिळाले.
मिश्र वाक्य - त्याला फळ मिळाले; कारण त्याने कष्ट केले होते.
संयुक्त वाक्य - त्याने कष्ट केले; म्हणून त्याला फळ मिळाले.

3) सुटी वाक्ये :

१) आरती सुरू झाली.
२) घंटानाद सुरू झाला.

केवल वाक्य - आरती सुरू झाल्यामुळे घंटानाद सुरू झाला.
मिश्र वाक्य - जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला.
संयुक्त वाक्य - आरती सुरू झाली म्हणून घंटानाद सुरू झाला.


MPSC, Talathi, Police Bharti साठी Notes by VisionGovAcademy | Follow करा रोजच्या Tricks साठी. #MarathiGrammar #वाक्यरूपांतर #MPSC2026

लक्षात ठेवा - वाक्यरूपांतर सोपे आहे!

मित्रांनो, वाक्यरूपांतर हा घोकंपट्टीचा विषय नाही. फक्त नियम आणि त्यामागचा Logic समजून घ्या. रोज 10 उदाहरणे सोडवा. वर दिलेले 9 प्रकार पाठ करा. परीक्षेत प्रश्न कुठूनही आला तरी तुमचे उत्तर चुकणार नाही.

VisionGovAcademy Tip: केवल = मुळे, मिश्र = कारण, संयुक्त = म्हणून. ही Trick कायम लक्षात ठेवा. आणखी अशाच Tricks साठी आमचे YouTube Channel @VisionGovAcademy Subscribe करा आणि Telegram Channel Join करा.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? Comment करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना पण Share करा - ज्ञान वाटल्याने वाढते! All the Best 💪

📚 संबंधित मराठी व्याकरण नोट्स (MPSC 2026)

VisionGov Academy वर MPSC, Police Bharti, Talathi व इतर स्पर्धा परीक्षांसाठी सोप्या भाषेत नोट्स आणि अभ्यास साहित्य उपलब्ध आहे.

www.visiongovacademy.online

Post a Comment

Previous Post Next Post