स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान
(अ) इ. स. 1818 ते 1885
पार्श्वभूमी
23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. इ. स. 1757 ते 1857 या शंभर वर्षांच्या कालखंडात प्रादेशिक विस्तार करून भारतावर इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केले. 1818 ला महाराष्ट्रात सत्तांतर होऊन येथील सत्ता ब्रिटिशांच्या हाती आली. माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनची दख्खन भागाचा 'कमिशनर' म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ब्रिटिश सत्तेविरोधी आंदोलनाची कारणे
- ब्रिटिश परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते. त्यांचे भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे या नव्या राजवटीत आपले सर्वस्व हिरावून घेतले आहे, अशी लोकांची भावना निर्माण झाली. त्यामुळे एतद्देशीयांच्यात त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली.
- ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाच्या तत्त्वावर आधारित होते. परिणामी कर जास्त प्रमाणात आकारले जाऊ लागले. त्यामुळे भारतीयांत असंतोष निर्माण झाला.
- ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केला. सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, मूर्तिपूजा इ. बाबत टीकाच सुरू केले. परिणामी भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात केली.
- मराठा सत्तेच्या न्हासामुळे नैराश्य आलेले व सत्तेपासून दूरावलेले संस्थानिक संतप्त झाले. त्यांनी रामोशी, भिल्ल, कोळी इ. ना हाताशी धरून सरकारला उपद्रव करण्यास सुरुवात केली.
- रामोशी, भिल्ल, कोळी इ. स्वतंत्रवृत्तीने जगणाऱ्या लोकांच्या विरोधात ब्रिटिशांनी धोरण स्वीकारल्याने वरील जमातींनी ब्रिटिशांना विरोध सुरू केला.
- वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या अमानुष धोरणाला विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा व स्फूर्ती मिळाली.
- त्रिमार्गाची अवकृपा, रोगराई, दुष्काळ, सरकारचे महसूल कर्मचारांशीपणा इ. कारणास्तव शेतकरी वर्ग दु:खी होता. ब्रिटिश सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही उप-योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना उठाव करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही.
वरील मुख्य कारणांमुळे भारतात पूर्व भागात पश्चिम बंगाल, भारतात मोठ्या प्रमाणात उठाव झाले. महाराष्ट्रात पहिला संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यामध्ये झाला.
1. रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचा उठाव
1-अ) उमाजी नाईक यांचा उठाव
रामोशांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळते. त्यांना स्वतःला रामवंशी समजत. म्हणून काही तज्ज्ञ या शब्दाची उत्पत्ती 'रामवंशी' व 'रानवंशी' म्हणजे रानात राहणारे करतात. निजामाच्या प्रदेशातील शोरापरच्या राजास ते आपला मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लाव असत. पुणे प्रांतातील रामोशांमध्ये चव्हाण आणि जाधव अशा आडनावांचे लोक दिसतात.
उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. त्यांचा जन्म भिवरी गावात इ. स. 1791 मध्ये झाला. प्रा. सदाशिव आठवले त्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हणतात, 'उमाजी एकटे बांबस सेशी उंचीचे, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता. तो क्रूर नव्हता. त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे.' वडिलांच्या काळापासूनच 'पुरंदर' किल्ल्याच्या बंदोबस्तात होता.
भोर जवळील 'बिंग' गावात इ. स. 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. उमाजीच्या अगोदर संतू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता याने मांबुड्याचे लष्करी खजिना लुटला (इ. स. 1824-25). संतू नाईकच्या मृत्यूनंतर सर्व रामोशांचे पुढारीपण उमाजी नाईकांकडे आले.
अनेक धनिकांना लुटले. अखेर इंग्रजांनी उमाजी विरुद्ध (इ. स. 1826) पहिला जाहीरनामा काढला. त्यामुळे उमाजी व त्याचे साथीदार पांडूजी यांना धरून देणाऱ्यास 100 रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी या भागात त्याने प्रचंड लुटालूट करून सरकारला जेरीस आणले.
इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून बक्षिसाची रक्कम 1200 रु केली आणि जाहीर केले की 'जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्यांचा मिळाफी समजला जाईल.'
उमाजीने स्वतःला 'राजे' म्हणून घ्यावयास सुरुवात केली. कुठल्याही डोंगरकपारीत लोक जमत तोच त्याचा दरबार असे. गोरगरिबांना दक्षिणा देणे, दान देणे अशी तो मदत करत असे. त्याच्या सोबत सर्व जातीतील लोक हजर असत. धोरणात्मक इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजीने वाढवली होती.
इंग्रजांना आव्हान पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन यांच्यासमोर इ.स.1827 मध्ये पुढील मागण्या केल्या.
- इंग्रजांनी अमृता रामोशी व बिनोबा यांना मुक्त करावे.
- रामोशांची परंपरागत वतने परत करावीत,
- पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये.
वरीलप्रमाणे इंग्रज न वागल्यास त्यांना रामोशांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल.
कलेक्टर रॉबर्टसनने 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून उमाजीलाला उत्तर दिले. या जाहीरनाम्याच्या द्वारे असे जाहीर केले की,
- जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये.
- उमाजी, भुजाजी, पांडुजी व येसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी रु.5000 बक्षीस दिले जाईल.
- रामोशी चार परगण्यांमध्ये जनतेला त्रास देत आहे. त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल.
- रामोशांसोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ती आजपासून वीस दिवसांत सरकारात हजर राहिल्यास तिला संपूर्ण माफी देण्याचा विचार केला जाईल.
- बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल.
कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतापला. त्याने पाच दिवसात पाच इंग्रजांना पकडले व त्यांची मुंडकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली आणि त्यानंतर पाच दिवसांनी (25 डिसेंबर 1827) दुसरा जाहीरनामा काढला तो पुढीलप्रमाणे -
- ठाणे, रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकार जमा न करता उमाजीलाला द्यावा.
- उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसा तयार ठेवा अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक/अधिकारी जबाबदार राहतील.
इंग्रजांनी माहिती काढून उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. परिणामी उमाजीने आपल्या कुटुंबाखातर इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले. त्याने इंग्रजांची नोकरी स्वीकारली. त्यातच खटाव, नातेपुते या भागात उमाजीने माणसे जमवल्याची खबर इंग्रजांना लागली म्हणून त्याला पकडण्यात आले. परंतु उमाजी इंग्रजांच्या कैदेतून निसटला.
इंग्रज सरकारने उमाजीलाला पकडण्याची जबाबदारी कॅ. अलेक्झांडर व कॅ. मॅकिन्टॉशवर सोपवली. उमाजीशी त्यांचा पहिला संघर्ष मांदाडेश्वरच्या डोंगरावर झाला; परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 26 जानेवारी 1831 ला पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्ने यांनी एक जाहीरनामा काढला. त्यामध्ये खालील घोषणा केली.
- उमाजी, भुजाजी, येसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी रोख 5000 व 200 बिघे जमीन दिली जाईल.
- सरकारला उमाजी बाबत बातमी देणाऱ्यास रु.2500 बक्षीस आणि 100 बिघे जमीन दिली जाईल.
- प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने बातमी पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातील.
वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एकाही व्यक्तीने उमाजीची माहिती दिली नाही. उलट कलेक्टरच्या जाहीरनाम्याला उत्तर देणारा जाहीरनामा उमाजीने काढला.
- दिसेले त्या युरोपियनांना ठार करावे.
- ज्यांची वतने व तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत, त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर ती वतने व तनखे आपण परत मिळवून देऊ.
- कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत. अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार असावे.
- कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये. अन्यथा त्या गावांचा विध्वंस केला जाईल.
या जाहीरनाम्यानंतर उमाजीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा इ. भागात दंगे घडवून आणून इंग्रजांना हैराण केले. साधारणतः 7 महिने हे उठाव सुरू होते. तरीही इंग्रजांना उमाजीलाला पकडता आले नाही.
इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 ला पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम 10,000 रु. आणि 400 बिघा जमीन एवढी केली व बातमी पुरवणाऱ्यास 5000 रु. रोख आणि 200 बिघा जमीन देण्याची घोषणा केली. इंग्रजांनी जाहीर केलेली रक्कम व जमीन इतकी मोठी होती की कोणीही या आमिषाला बळी पडेल. उमाजीचे जवळचे सहकारी काळू व नाना त्याच्या विरोधात गेले. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यानेही त्यांना सहकार्य दिले. नानाने उतोळी येथे 15 डिसेंबर 1831 ला उमाजीलाला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले. उमाजीलाला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834 ला फाशी देण्यात आली.
1-ब) कोळ्यांचे उठाव
किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. परंतु इंग्रजी राजवटीत किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे कोळ्यांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले. कोळ्यांचे उठाव तीन टप्प्यांत झाले.
पहिला टप्पा - इ. स. 1824 च्या दरम्यान मुंबई भागात, नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. तो उठाव ब्रिटिशांनी दडपला. पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी रामजी भांगडिया हा अत्यंत नाराज झाला. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरकारी धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली. सारा भरण्यास नकार दिला. कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्रे जमवली. इ. स. 1828 साली रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला. कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी कॅ. अलेक्झांडर व मॅकिन्टॉशची नियुक्ती केली. त्याने कोळ्यांच्या विरोधी जोरदार मोहीम राबवली. काही वर्षे कोळ्यांचा उठाव थांबवण्यात ब्रिटिशांना यश आले.
दुसरा टप्पा - कोळ्यांनी पुन्हा उठाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इ. स. 1839 ला पुण्यात एकदम उठाव केला. यावेळी त्यांनी दोन घोषणा केल्या. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास, पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. यावेळी सरकारी खजिना 'घोडनदी' येथे होता. 150 कोळ्यांनी खजिन्याला वेढा घातला. 'रोज' या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावून घेतले. 54 कोळ्यांना पकडण्यात आले. त्यांना कडक शिक्षा देण्यात आली. काहींना फाशी दिले. त्यामुळे कोळ्यांचा उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना यश आले. पुढील 5 वर्षे कोळी शांत राहिले.
तिसरा टप्पा - इंग्रजांनी कोळ्यांचा दोन वेळा उठाव मोडून काढला असला तरी त्यात त्यांना पूर्ण यश आले नव्हते. कोळ्यांनी 5 वर्षे थांबून शस्त्रे आणि माणसे गोळा केली. यावेळी रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, नगर परिसरात उठाव केला. इ.स.1845 मध्ये बापू भांगडियाला पकडण्यात आले. त्यामुळे कोळ्यांतील असंतोष अधिकच वाढला. इंग्रजांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. कॅ. जेल याने कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांच्या नेत्यांना पकडण्यात आले. त्यांना कठोर शिक्षा दिल्या. इ. स. 1850 पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला.
1-क) भिल्लांचे उठाव
भिल्लांच्या बरडा, डागची, माऊची, वसावा, तडवी इ. जाती होत. लढाऊ बाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होय. इ. स. 1803 मध्ये उठाव केला. त्याचे स्वरूप प्रखर होते. यावेळी पेंढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता. इ. स. 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ, अजंठा भागात उठाव केले. यावेळी कॅ.ब्रिग्ज हा या भागाचा कलेक्टर होता. त्याने भिल्लांचे उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले.
भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यामध्ये सातमाळच्या चिलनाईक याचा समावेश होतो. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. कॅ. ब्रिग्जने त्याचा पाठलाग करून त्यास पकडले व त्यावर आणी ठेवून त्याला फाशीची शिक्षा दिली. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅ. ब्रिग्जने कॅ. डुसार्टची नियुक्ती केली. त्याने भिल्लांचा प्रमुख शेख दुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली.
कॅ.ब्रिग्जने मेजर मोरीन याच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. त्याने बंड मोडून काढले. पुन्हा इ. स. 1822 मध्ये 'हिरा' नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. या उठावाचे स्वरूप मोठे होते. इ. स. 1825 साली सेवाराम सिंघाडिया याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली. यावेळी सेवारामच्या बंडाला देशी संस्थानिक, देशमुख यांचा पाठिंबा मिळाला होता.
लेफ्टनंट ऑट्रम हा भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडले. त्याच्या साथीदारांची मवाळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ऑट्रमने या सर्वांचे गुन्हे माफ केले. सरकारने बळकावलेल्या जमिनी त्यांना परत केल्या. सरकारने बी-विभागांचे शासनाकडूनच व्यवस्था करून दिली. थोडक्यात, भिल्लांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही याची इंग्रज अधिकाऱ्यांना जाणीव झाली.
2. 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर त्यास 'पहिले स्वातंत्र्यसमर' म्हणून संबोधतात. इतिहासकार न.र.फाटक यांस 'शिपायांचे भाऊगर्दी' म्हणून संबोधतात.
रंगो बापूजी गुप्ते आणि 1857 चा उठाव :
छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी अविरत प्रयत्न केले. त्यांना इंग्लंडलाही जावे लागले. परंतु तेथून हताश होऊन परत यावे लागले. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याचे विचारात असतानाच महाराष्ट्रात 1857 च्या उठावाची सुरुवात झाली होती. रंगो बापूजींनी याचा फायदा उठवण्याचे ठरवले.
उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आरळे, देऊर इ. ठिकाणे निवडली. परंतु त्यांच्या या हालचालींचा सुगावा इंग्रज सरकारला लागला. सरकार सावध झाले. त्यांनी धरपकड सुरू केली. मात्र रंगो बापूजी भूमिगत झाले. आरोपींना फासावर लटकवले.
कोल्हापूरमधील उठाव - 1857 च्या उठावाचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले. पहिला उठाव 31 जुलै 1857 ला रात्री झाला. 27 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली व युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले. बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्यावरून फौजा बोलावण्यात आल्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव दडपून टाकला.
दुसरा उठाव - 6 डिसेंबर 1857 रोजी घडून आला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली. उठाव सुरू होताच कोल्हापूरातील हिंदी शिपाई बंड करून उठतील असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ब्रिटिश सावध होऊन दुसऱ्या उठावाच्यावेळी त्यांनी अनेकांना ठार केले व उठाव दडपून टाकण्यात आला.
पेठमधील उठाव - नाशिक जिल्ह्यातील पेठेकडे या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला होता. पेठेचा राजा भगवंतराव निळकंठराव हा या उठावाच्या मागे होता. 6 डिसेंबर 1857 रोजी कोळी लोकांनी येथील हर्सलच्या बाजारात अचानक लूटमार केली. त्यावेळी ग्लासपुल हा युरोपियन अधिकारी पेठेकडे येत असल्याची बातमी आली. त्यामुळे कोळी हर्सलच्या जंगलामध्ये पळून गेले. जंगलातील लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लास पुलने हद्दपार केले. अनेकांना शिक्षा केल्या. पेठेच्या राजाला फाशी देण्यात आली.
नाशिक-नगरमधील उठाव - 1857 च्या बंडात नाशिक नगर मध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली. जानेवारी 1857 ला नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यात जोरदार चकमक झाली. ब्रिटिशांनी भिल्लांवर हल्ला करून बऱ्याच बंडखोरांना ठार केले तर काही भिल्लांना कैद केले. त्यातील काहींना जन्मठेप काहींना फाशी दिली गेली.
जमखिंडी संस्थानातील उठाव - यावेळी जमखिंडीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते. ते इंग्रजांच्या मर्जीतील होते. उठावाचे लोण महाराष्ट्रात पसरत चालले होते. त्यामुळे आपल्या संस्थानात काही गडबड झाल्यास त्यास तोंड देण्यास आपण तत्पर असावे या उद्देशाने त्यांनी शस्त्रास्त्रे व दारूगोळा किल्ल्यात साठवला. किल्ल्याची दुरुस्ती करून घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या ह्या हालचाल तेथील रेसिडेंटला संशयास्पद वाटल्या. त्याने तेथील सर्व वृत्तांत गव्हर्नरला कळवला. परिणामी इंग्रजांनी जमखिंडीतील संशयितांना पकडण्यास सुरुवात केली. त्यामुळे उठाव होण्यापूर्वीच तेथे इंग्रजांनी बंदोबस्त केला.
मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव - इंग्रज सरकारने 1857 मध्ये शस्त्रबंदीचा कायदा लागू केला. त्यान्वये, 'आपापली हत्यारे लोकांनी सरकारात जमा करावीत. ज्यांना वैयक्तिक संरक्षणासाठी हत्यारे हवी असतील त्यांनी अर्ज करावा, त्यांना परवाना दिला जाईल.' असे जाहीर केले होते. परंतु मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांनाहा कायदा मान्य नव्हता. तरीही मुधोळ संस्थानाच्या कारभाऱ्याने बेरडांच्या प्रमुखाला या कायद्याचे गांभीर्य समजावून देऊन त्यांच्या शस्त्रांची नोंद करून घेतली. परंतु बेरड समाजाने आपल्या प्रमुखाला गद्दार घोषित करून वाळीत टाकले. बेरडांनी गावोगावी जाऊन प्रचार केला की, कोणीही शस्त्रास्त्रे सरकारात जमा करू नयेत. पाचवेच्या आसपास बेरड एकत्र आले. मुधोळच्या कारभाऱ्याने तेथील पोलिटिकल एजंटला बातमी कळवली आणि विजापूरहून सैन्य बोलावून घेतले. इंग्रज सैन्य आणि बेरड यांच्यात चकमकी झाल्या. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सैन्य परत गेले; परंतु हे सैन्य रात्री दोन वाजता हुल्लाडीत शिरले आणि त्यांनी सुमारे दोनशे बेसावध बेरडांची कतल केली.
नागपूरमधील उठाव - 13 जून 1857 ही उठावाची तारीख ठरली. त्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशात शंभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडन्सी, सीताबर्डीचा किल्ला, कामठी इ. ठिकाणे ताब्यात घ्यायची होती. दुर्दैवाने या उठावाचा सुगावा इंग्रजांना लागला. त्यांनी सावध होऊन दारूचे फुगे आकाशात फुटणार नाहीत याची दक्षता घेतली. बंडखोर वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी इंग्रजांनी पकडलेल्या तीन बंडखोरांना फाशी दिली आणि अनेकांना जन्मठेप सुनावली. त्यामुळे प्रत्यक्षात उठाव होऊ शकला नाही.
औरंगाबादमधील उठाव - 1857 च्या उठावाच्या वेळी औरंगाबाद निजामी राजवटीत होते. येथील घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम शिपायांत चाललेल्या हालचालींबाबत इंग्रज साशंक बनले. उठावाचा उद्रेक होण्यापूर्वीच त्यांनी उठावाला पाठिंबा देणारे संशयित शोधले आणि त्यांना फाशी दिली. कित्येकांना जन्मठेप दिली. अनेकांना सैन्यातून बडतर्फ केले. परिणामी तेथील उठाव अयशस्वी झाला.
📚 भारतीय इतिहास – Complete Study Notes
🇮🇳 स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण इतिहास नोट्स एका ठिकाणी!
🎯 रोज नवीन नोट्स, MCQs आणि चालू घडामोडींसाठी भेट द्या
🌐 www.visiongovacademy.online

Post a Comment